सोमवार, ३ जुलै, २०१७

आषाढी एकादशी


आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला, शेषशायी भगवान श्री विष्णु झोपी जातात. ते कार्तिकी एकादशीपर्यंत झोपलेलेच असतात अशी समजूत आहे. म्हणूनच चातुर्मासाचाआरंभ आषाढ शुक्ल ११ ला होतो व कार्तिक शुक्ल ११ ला चातुर्मास संपतो. धार्मिक वृत्तीची माणसे हे चार महिने व्रतस्थ राहतात. चातुर्मासातील चार महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात ती पाळण्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना आषाढीच्या दिवशी करतात.


आषाढ शुद्ध एकादशीच्या एक-दोन दिवस आधी येणाऱ्या नवमीला महाराष्ट्रात कांदे नवमी म्हणतात.

एकादशीची व्रते व उपवास

एकादशीला उपवास करण्याची प्रथा आहे. असा उपास करणाऱ्यांमध्ये दोन भेद आहेत. स्मार्त आणि भागवत. त्यासाठी दोन प्रकारच्या एकादश्या मानल्या जातात. भागवत धर्म पाळणारे, वारकरी इत्यादी लोक भागवत एकादशी, तर स्मृतींना मानणारे स्मार्तएकादशी पाळतात. एखाद्या महिन्यात दशमीचा, एकादशीचा वा द्वादशीचा क्षय असेल किंवा द्वादशीची वृद्धी असेल तर त्या महिन्यात बहुधा,स्मार्त आणि भागवत अश्या दोन एकादश्या दोन स्वतंत्र दिवशी येतात. दर महिन्याच्या प्रत्येक पक्षात अश्या दोन एकादश्या दोन वेगवेगळ्या दिवशी येतीलच असे नाही. पण जेव्हा एखाद्या पक्षात येतात तेव्हा, त्या एकादश्यांच्या निर्णयाचे नियम खाली क्रमवार दिले आहेत.

१. एकादशीच्या सूर्योदयापूर्वीच्या ९६ मिनिटांत जर दशमी असेल, आणि, (अ) सूर्योदयापूर्वीच दशमी संपली तर दशमीचा, व (आ) सूर्योदयानंतर संपली तर एकादशीचा क्षय असतो. तेव्हा त्यापुढच्या द्वादशीच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे समजतात..

२. द्वादशीचा क्षय झाला असेल तर एकादशी व द्वादशीच्या युग्माच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे मानले जाते.

३. द्वादश्या जर दोन असतील तर पहिल्या द्वादशीच्या दिवशी भागवत आणि त्याच्या पूर्वीच्या दिवशी स्मार्त एकादशी धरतात.

४. एकादश्या जर दोन असतील दोन्ही पक्ष दुसरी एकादशी धरतात.

५. वरील चार अपवाद वगळता, एरवी सूर्योदयाची जी एकादशी असेल ती स्मार्त आणि भागवत अशा दोन्ही पक्षांची एकादशी समजतात.

६. पहिल्या दिवशी येणाऱ्या (स्मार्त) एकादशीला नाव असते, भागवत एकादशीला नसते. पण त्या पक्षात लागोपाठच्या दोन सूर्योदयांना दोन एकादश्या येत असतील तर दुसरीला नाव असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा