शनिवार, २२ जुलै, २०१७

चंद्रशेखर आझाद जयंती


चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी(जुलै २३, १९०६ - फेब्रुवारी २७, १९३१) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. राम प्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (एच.आर.ए.) या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (एच.एस.आर.ए.) या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली. त्यांना भगत सिंगयांचे गुरू मानले जाते व ते एच.एस.आर.ए. संघटनेचे प्रमुख होते.

चंद्रशेखर आझाद

जन्म:जुलै २३, १९०६
भाबरा, झाबुआ तालुका मध्यप्रदेश

मृत्यू:फेब्रुवारी २७, १९३१
अलाहाबाद

चळवळ:भारतीय स्वातंत्र्यलढा

संघटना:कीर्ति किसान पार्टी, नवजवान किसान सभा

धर्म:हिंदू

वडील:पंडित सिताराम तिवारी

आई:जगरानी देवी


जन्म व बालपण

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै, इ.स. १९०६ रोजी सध्याच्या अलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'सिताराम तिवारी' व आईचे नाव 'जगरानी देवी' असे होते. त्यांचे पृर्वज कानपूर जवळच्या बादरका गावात राहात असत. जगरानी देवी ह्या सिताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथील संस्कृत पाठशाळेत गेले. डिसेंबर, इ.स. १९२१ मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात तेव्हाच्या १५वर्षे वयाच्या चंद्रशेखरने सहभाग घेतला होता. त्यासाठी त्याला अटक झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव 'आझाद' असल्याचे नोंदवले. तेव्हापासून ते त्याच आडनावाने ओळखले जाऊ लागले.

मृत्यू

दिनांक २७ फेब्रुवारी, इ.स. १९३१ रोजी, अलाहाबादमधील अल्फ्रेड पार्क येथे 'सुखदेव राज' या क्रांतिकारक सहकाऱ्याला भेटण्यासाठी गेले असतांना एका अज्ञात खबऱ्याने पोलिसांना वार्ता दिली. पोलिसांनी मैदानाला वेढा घातला व चंद्रशेखर आझाद व पोलिसांमध्ये गोळीबार झाला. त्यांनी एकहाती गोळीबारात तीन पोलिसांना मारले मात्र त्यांच्याजवळील बंदुकीच्या गोळ्या संपत आल्यामुळे शेवटच्या गोळीने त्यांनी स्वत:ला मारून घेतली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नावचंद्रशेखर आझाद मैदान असे करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा