बुधवार, ७ जून, २०१७

वटपौर्णिमा

ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात

वटसावित्री व्रत

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितले आहे.तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा.सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान सावित्री , नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत. या व्रताचा विधी असा- नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावी. तिच्यावर सत्यवानआणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्यात. मग त्यांची षोडशोपचार पूजा करावी. त्यानंतर पाच अर्घ्य द्यावे. मग सावित्राची प्रार्थना करावी.पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी. या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली तरी रूढी मात्र वेगळी आहे.


सावित्रीचे आदर्श व्यक्तिमत्व

सावित्री ही सर्वसामान्य स्त्री नाही. ती जणू एक रत्नपारखी आहे.तिने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरास आई-बाप अन देवगुरु यांच्या सूचनेकडे लक्ष न देता माळ घातली.पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम ती आपल्या पर्यावरणाच्या ज्ञानाने ,चिकाटीने आणि दुर्दम्य इच्छाशक्तीने करून दाखविते. योगी अरविंद यांनी आध्यात्मिक परिभाषेतून सावित्रीचे महत्व सांगणारे 'सावित्री' नावाचे महाकाव्य लिहिले आहे.


वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व

पारंपरिक कथा

अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.

सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.

पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.

सत्यवानाचा मृत्यू जेंव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेंव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागली. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेंव्हा त्या वचनबध्द झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा